सकाळ वृत्तसेवा
Sunday, June 05, 2011 AT 11:53 PM (IST)
Tags: fish,   chandrapur,   vidarbha
चंद्रपूर - पर्यावरण दिनानिमित्ताने शहरात वेगवेगळे कार्यक्रम सुरू असतानाच येथील इरई नदीच्या पात्रात हजारो मृत मासोळ्या पाण्यावर तरंगताना दिसून आले. या नदीच्या पाण्यावर तेलाचा तवंग (फरनेस ऑइल) दिसून येत आहे. हे ऑइल चंद्रपूर महाऔष्णिक वीजकेंद्राने सोडले असावे, असा पर्यावरण प्रेमींनी निष्कर्ष काढला आहे. मात्र, वीजकेंद्राच्या व्यवस्थापनाने ही बाब नाकारली असून, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले.

येथील दाताळा परिसरातील नागरिक सकाळी फिरण्यासाठी इरई नदीच्या परिसरात गेले. तेव्हा त्यांना मृत मासे पाण्यावर तरंगत असताना दिसले. तत्पूर्वी इरई नदीत दाताळा पुलाजवळ असलेल्या पालिकेच्या वॉटर फिल्टर प्लॅंटच्या ऑपरेटरला रात्री दोनच्या सुमारास नदीत लाल पाणी दिसले. त्याने याची माहिती पालिकेला सकाळी दिली होती. दरम्यान, आज (ता. पाच) सकाळी परिसरातील नागरिकांनी याची माहिती इको-प्रोचे बंडू धोतरे यांना दिली. धोतरे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह नदीपात्राची पाहणी केली. तेव्हा, त्यांनाही धक्काच बसला. नदीतपात्रात सगळीकडे हेच दृश्‍य होते. पाण्यावर तेलाचा तवंग पसरलेला होता. त्यामुळे तेलामुळे मासे मृत्युमुखी पडले असावे, अशी शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, नदीत तेल नेमके कुणी सोडले, ही बाब अद्याप गुलदस्त्यातच आहे. या नदीच्या पात्रालगत चंद्रपूर महाऔष्णिक वीजकेंद्र आहे. गतवर्षी वीजकेंद्राने पहिला पाऊस आल्यानंतर नदीत हजारो लिटर तेल सोडले होते. तेव्हाही हजारोंच्या संख्येने मासे मृत्युमुखी पडले.